
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
भंडारा -सण उत्सवात सर्व धर्म समभावाची भावना व्यक्त करून प्रत्येक सण गुण्यागोविंदाने एकत्र साजरे करा असे लाऊडस्पिकरच्या माध्यमातून आवाहन करीत साकोली पोलीसांनी ( शुक्र. २९ ऑगस्ट ) ला सायं. ६ ला शहरातील प्रत्येक प्रभागातून “रूट मार्च काढला. हा रूट मार्च पोलीस ठाणे साकोली येथून नगरपरिषद चौक, बसस्थानक चौक, प्रगती कॉलनी चौक, सेंदूरवाफा शहर प्रवेशद्वार चौक, एसबीआय रोड, होमगार्ड परेड मैदान मार्ग, एकोडी रोड चौक, जूने पंचायत समिती, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मार्ग, गणेश वार्ड, दिवाणी न्यायालय, लाखांदूर रोड, तलाव वार्ड, श्रीराम भक्त हनुमान मंदिर, जामा मस्जिद रोड ते गोवर्धन चौक, उपजिल्हा रुग्णालय, जूने तहसील ते परत पोलीस ठाणे पर्यंत काढण्यात आला. यादरम्यान कुणीही सण उत्सव काळात मद्यप्राशन करून हुडदंग घातल्यास तात्काळ गुन्हा दाखल करून अटक केली जाईल, अनावश्यक रात्री बेरात्री जमाव करून शांतता भंग करू नये, अवैध दारू, गांजा विक्री करतांना आढळून आल्यास गंभीर गुन्हा दाखल केला जाईल आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच जातीय सलोखा निर्माण करून प्रत्येक सण आनंदाने व उत्साहाने साजरे करा असे आवाहन करण्यात आले. या रूट मार्चला उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूल, उपनिरीक्षक राजू साळवे, उपनिरीक्षक किसन रेहपाडे यांसह पोलीस अंमलदार, पोलीस नायक, महिला पोलीस, वाहतूक पोलीस आणि होमगार्ड पथक असे २०० पोलीस सुरक्षा दल सामिल झाले होते.



