
सचिन ढोके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत ब्लॉक मास्टर ट्रेनरचे तीन दिवशीय प्रशिक्षण कालपासून सुरू झाले. सेमाना रोडवरील एकलव्य मॉडेल रेसीडेन्शियल स्कूल येथे प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते तर अहेरी येथे प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.सदर प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण आठ मास्टर ट्रेनरमार्फत ब्लॉक स्तरावरील प्रशिक्षण दिले जात असून सात महत्त्वपूर्ण मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन, तळापासून नियोजन व सहभाग, उत्पादक तक्रार व अभिप्राय प्रणाली, राष्ट्रीय व राज्य योजनांची एकत्रित अंमलबजावणी, २०४७ च्या विकसित भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत स्थानिक योजना, गावपातळीवर नेतृत्वनिर्मिती तसेच प्रतिसादात्मक प्रशासनाद्वारे योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत वितरण या मुद्द्यांचा समावेश आहे.गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १२ ब्लॉकमधील ४४१ गावांचे क्लस्टर तयार करण्यात आले असून पुढील टप्प्यात ब्लॉक ट्रेनर हे प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन प्रशिक्षण देणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामपातळीवर जबाबदार व परिणामकारक प्रशासनाची पायाभरणी होणार असून नागरिकांचा थेट सहभाग वाढणार आहे.



