
*रायगडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रकार समीर बामुगडे यांची तक्रार: अपहरण प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी गोरेगाव पोलिसांकडून दबाव?”
संजीव भांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी
रोहा (जि. रायगड) – गेल्या दोन दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या समीर रामा बामुगडे यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्याकडे एक तक्रारपत्र सादर करून गंभीर आरोप केले आहेत. या पत्रात त्यांनी असा दावा केला आहे की, त्यांच्यावरील अपहरण प्रकरणातील सहआरोपी उत्तम जाधव याला वाचवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनकडून दबाव टाकला जात आहे.
पत्रकार समीर बामुगडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी अवैध लाकूड तस्करी करणाऱ्या विजय काते या इसमाविरुद्ध वृत्त प्रसिद्ध केल्यावर, त्या वृत्तामुळे चिडून विजय कातेने दि. २७ जून २०२५ रोजी त्यांचे पनवेल बस स्थानकावरून अपहरण केले. याबाबत त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, सध्या नवी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही अपहरणाची घटना पनवेल ते मंडणगड (रत्नागिरी) या भागांमध्ये घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
समीर बामुगडे यांच्या म्हणण्यानुसार, उत्तम जाधव हा या अपहरण प्रकरणातील एक मुख्य सहभागी असून, त्याचे मूळ गाव मंडणगड तालुक्यात आहे. मात्र, त्याला वाचवण्याचा प्रयत्न गोरेगाव पोलीस स्टेशनकडून केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाशी गोरेगाव पोलीस स्टेशनचा कोणताही थेट संबंध नाही, तरीही त्यांच्याकडून समीर बामुगडे यांना उत्तम जाधवने तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात गोरेगाव पोलीस स्टेशनचे श्री. एस. एन. रासकर यांच्या नावाने २४ जुलै २०२५ रोजीचा अर्ज व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आल्याचेही बामुगडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
याप्रकरणी त्यांनी अलिबाग येथील पोलीस अधिक्षकांना विनंती केली आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा अथवा दबाव उघड होऊ शकेल. त्यांनी पत्राच्या शेवटी असा इशारा दिला आहे की, एका गुन्हेगारासाठी जर पोलीस यंत्रणाच वापरली जात असेल, तर हा लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा आहे.
या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाची काय भूमिका असते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.