



सचिन ढोके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
वर्धा : आई वडीलांसोबतच मुलांमध्ये चांगले संस्कार घडविण्याची जबाबदारी शिक्षक पार पडत असतात. नवीन पिढीला दिशा देण्याचे काम शिक्षकांकडून सातत्याने होत आहे. त्यामुळेच अशा शिक्षकांचा गौरव होणे तितकेच महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपण काम करतो, सोबतच शाळांचा आधुनिक विकास होणे महत्वाचे आहे. यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्यावतीने आदर्श शाळा, पीएमश्री व सीएमश्री शाळा योजना राबवून शाळांना पायाभूत सुविधा निर्माण करुन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या स्व. सिंधुताई सपकाळ सभागृहात जिल्हा शिक्षक गुणगौरव व पुरस्कार वितरण तसेच गुणवंत्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जयश्री घारफळकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक महेंद्र गजभिये यांची उपस्थिती होती.सद्या शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल खाजगी शाळेकडे वाढता. खाजगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळांना पायाभुत सुविधा निर्माण देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात आदर्श शाळा योजना, केंद्र शासनाच्या पीएमश्री शाळेच्या धर्तीवर राज्यात सीएमश्री शाळा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा, दर्जेदार शैक्षणिक साहित्य, वाचनालय, शौचालय आदी व शाळेच्या इमारतीचे आधुनिकीकरण आदी सुविधा निर्माण करुन देण्यात येत आहे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक भावना निर्माण होण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरस्कारामध्ये 5 हजार वरुन 51 हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या 25 विद्यार्थ्यांना बंगलोरच्या इस्रो येथील विज्ञान संशोधन केंद्रास भेट देण्यासाठी नेणार असल्याचे यावेळी डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी वर्धा येथे लवकरच कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार येईल. देशासह राज्यात शिक्षकांची कमी नाही, परंतू शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यासाठी शिक्षकांच्या काही समस्या असल्यास सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. पंकज भोयर म्हणाले.देशाच्या प्रगतीत शिक्षकांचा मोठा वाटा आहे. शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी करावा. सद्या आधुनिक तंज्ञज्ञानाचा वापर होत असतांना कृत्रिम बुध्दीमत्ता या डिजिटल माध्यमाचा वापर करुन चांगले विद्यार्थी घडविण्याचे कार्य करावे. जिल्ह्यातील सरकारी शाळांना पायाभूत सुविधा निर्माण करुन देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या.शिक्षक हे पुस्तकातील पाठ शिकविणारे नसतात तर विद्यार्थी घडविणारे असतात मातेनंतर विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारे शिक्षक असतात. पुरस्कार प्राप्त शिक्षकांकडून इतर शिक्षकांनी प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावे, असे पराग सोमण म्हणाले.यावेळी पालमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील शितल वडनेरकर, आष्टी तालुक्यातील निलेश इंगळे, वर्धा रजनीश फुलझेले, कारंजा चितेश्वर ढोले, हिंगणघाट मंगेश डफ, सेलू देवकी दळवी, देवळी गणेश जाधव व समुद्रपूर तालुक्यातील शंकर कोल्हे या जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच नवोदय परिक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी व इयत्ता पाचवी मध्ये शिष्यवृत्ती परिषेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र फुलझेले यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येन उपस्थित होते.



