

सोशल मिडीयातून देशप्रेम जागवा – एस. पी. नुरूल हसन
साकोलीत शांतता व जातीय सलोखा बैठक संपन्न ; तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित
संजीव भांबोरे
भंडारा -सोशल मिडीयातून जातीय तेढ निर्माण न करता देशप्रेमाची भावना जागवा, युवकांमध्ये जोश निर्माण होईल” असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी साकोलीत ( शुक्र. २२ ऑगस्ट ) ला शांतता व सलोखा समितीच्या बैठकीत एमबीपी कॉलेज सभागृहात केले. प्रसंगी तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी यावेळी हजर होते.
उपविभागीय पोलीस कार्यालय, साकोली पोलीस ठाणे वतीने सण उत्सव काळात सामाजिक एकोपा निर्माण रहावा यासाठी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन, गुन्हे अन्वेषण शाखेचे उप अधीक्षक सुभाष बारसे, एसडीपीओ मनोज सिडाम, नगरपरिषद सीओ मंगेश वासेकर, पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, नायब तहसीलदार एस. सी. शेंडे, भुमेश्वर पेंदाम, महावितरण अभियंता रविंद्र कापगते आदी हजर होते. बैठकीत इंद्रायणी कापगते, आदर्श सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे, राजू दुबे, शब्बीर पठाण, भावेश कोटांगले आदींनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात एसपी नुरूल हसन यांनी सांगितले की, सोशल मिडीयातून जातीय तेढ, दंगली भडकविणे असे उत्तेजनार्थ कार्य न करता देशप्रेमाची भावना जागवा याने युवकांमध्ये जोश निर्माण होईल. अवैध धंदे करणा-यांची पूरेपूर माहिती पोलिसांना आँनलाईन व्हॉट्सॲपहून द्यावी त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. सणांच्या काळात सर्व धर्म समभावाची भावना निर्माण करा. जे यात सामाजिक तेढ निर्माण करतील अश्यांची यादी बनवा त्यांवर तातडीने कारवाई केली जाईल. ही पूर्वजांची मालमत्ता संपत्ती आहे कुणी अवैध कब्जा केला तर तातडीने नियमांनी तक्रार दाखल करावी. उत्सवात अवैध धंदे, दारू विक्री गांजा यावर आमची भंडारा पोलीस जलदगतीने कारवाई करायला सक्षम आहे. कारण आज सन २०२५ मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे. आज भंडारा जिल्हा पोलीस सायबर क्राईम बाबद महाराष्ट्रात नंबर १ ठरलेली आहे. करीता सोशल मिडीयाला शस्त्र बनवा पण ते देशप्रेम आणि सामाजिक व जनहितार्थ कार्यासाठी तुमच्या सोबत सर्व आजची युवा पिढी तुमच्या साथीला असेल असे वक्तव्य केले. मुख्याधिकारी मंगेश वासेकर हे म्हणाले की, सणात जनतेच्या काय समस्या आहेत ते कळवा त्यावर सर्व धर्म समभावाची भावना ठेवून सर्व समस्यांवर तोडगा तातडीने काढला जाईल.
शांतता समितीच्या बैठकीत आभार व्यक्त करतांना पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर म्हणाले की, साकोली येथे सर्व समाजाचे बांधव राहत असून आजपर्यंत येथे जातीय दंगल झाली नाही. तर जनतेने सुद्धा पोलीस विभागाला मित्र समजून सहकार्य करण्याचे आवाहन केले. सभेला संचालन पोलीस पाटील अजय घरडे यांनी केले. येथे सर्व तंटामुक्त समितीचे, पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळ, ईद ए मिलाद उत्सवाचे आयोजन, बौद्ध विहार समितीचे सदस्यगण तथा साकोली सेंदूरवाफा शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झाले होते.



